
बातमी कट्टा : ग्रामपंचायत बोरगांव व जातोडा आरोग्य उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत कार्डचे शाळेच्या प्रांगणात मोफत नोंदणी अभियान चालवण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना नेमून दिलेल्या रुग्णालयांद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जातात.
देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरली आहे. ही योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली होती.
आयुष्मान भारत योजनेला जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत औषधांचा व उपचाराचा खर्च शासन करणार असून 1350 आजारांवर उपचार केले जाणार आहेत.
ग्रामपंचायत बोरगांव तर्फे सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी पंचायत समिती शिरपूर आरोग्य विभागाशी संपर्क साधून गावात मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी कॅम्प लावण्या संदर्भात विनंती केली होती.
जातोडा आरोग्य उपकेंद्राचे अधिकारी डॉ विनोद पाटील यांनी बोरगांव ग्रामस्थांची आयुष्यमान भारत कार्डची मोफत नोंदणी केली. यावेळी आशा सुपरवायझर मनिषा पाटील व आशा सेविका निकिता जोशी यांनी मदत केली.