भाजप युवा मोर्चाची मा.मुख्यमंत्री व मा. उप मुख्यमंत्री यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी

सविस्तर व्हिडीओ बघा

बातमी कट्टा:- पुण्यातील एम.पी.एस.सी परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली.याबाबत धुळे पोलीस अधिक्षक यांच्याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची विनंती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले की , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्यास लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही.अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. एकुण ४१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत या नियुक्ती सरकारने पुढे ढकलल्या. मागील गेल्या काही महिन्यात अनेक स्पर्धा परीक्षांची जीव तोडुन तयारी करण्याऱ्या आणि त्यात यश मिळवणाऱ्या तरुणांचा सरकार विरुद्ध संघर्ष चालु आहे याच उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चा,धुळे महानगर वतीने दि. १५ जुन २०२१ रोजी आक्रोश आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना “MPSC च्या अनेक परीक्षा व निकाल 2019 पासून विविध कारणांमुळे रखडले आहेत ,शासनाने या परीक्षांची तारीख ताबडतोब घोषित करावी व निकालांचा मार्ग मोकळा करावा तसेच नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी.” अश्या स्वरूपाची मागणी घेऊन निवेदन देण्यात आले होते.

२०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जुन २०२० रोजी लागला त्याला १ वर्ष होऊन गेले तरीही अजुन या निकालात निवड झालेल्या विद्यार्थींची अजुन पर्यंत नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संयम संपत आल्याचे राज्यात या दुर्दवी घटनेमुळे दिसुन येत आहे. यामुळे एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करू नये या तरुणाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे. म्हणुनच राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्यावर IPC कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा तसेच ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी विनंती धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना ॲड- रोहित चांदोडे (भाजपा युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष) यांनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: