
बातमी कट्टा:- ग्रामपंचायत शिपाईकडे साखरपुड्यासाठी स्वताच्या बुलेट मोटरसायकलीने ग्रामसेवक व शिपाई डब्बलशिट जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने मोटरसायकलीला जोराने धडक दिल्याने ग्रामसेवक व ग्रामपंचायत शिपाई दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि 20 रोजी दुपारी घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 20 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर धुळे ते साक्री रोडवर कुसुंबा गावाजवळ मोटरसायकलीला ट्रकने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथील ईश्वर पंढरीनाथ पवार वय 46 हे अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. आज बोदर्डे,पो.मुडी तालुका अमळनेर येथील बोदर्डे ग्रामपंचायतचे शिपाई संजय हिरामण भिल वय 42 यांच्या कडे धुळे तालुक्यातील नेर येथे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक ईश्वर पवार हे एम.एच 18 बी.व्ही 9889 क्रमांकाच्या स्वताच्या बुलेट मोटरसायकलीने शिपाई संजय भिल यांना सोबत घेऊन नेर ता धुळे येथे जाण्यासाठी निघाले होते.

दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर धुळे ते साक्री रोडवर कुसुंबा गावाजवळील पुलावर साक्रीकडून धुळ्याकडे येणाऱ्या एम.एच 18बी.जी 7499 क्रमांकाची भरधाव मालट्रकने त्यांच्या मोटरसायकलीला समोरुन जोरदार धडक दिली.यात ग्रामसेवक ईश्वर पवार आणि शिपाई संजय भिल गंभीर झाले.त्यांना उपस्थितांनी 108 रुग्णवाहिकेने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.यावेळी डॉ. प्रनांजली शिवशिवे यांनी ग्रामसेवक ईश्वर पवार आणि शिपाई संजय भिल दोघांना तपासून मृत घोषित केले.
याबाबत मयत ग्रामसेवक ईश्वर पवार यांचे चुलत भाऊ सोपान रमन पाटील वय 42 रा.पडावद तालुका शिंदखेडा यांनी एम.एच 18बी.जी 7499 क्रमांकाच्या मालट्रक चालक विरुध्द धुळे तालुका पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
