
बातमी कट्टा:- धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वलवाडीसहीत 10 गावांतील नागरीकांना राहण्यासाठी घर व व्यवसायासाठी दुकानांचे बांधकाम करण्याची परवानगी मिळावी व जागेचा उतारा मिळावा अशी मागणी निवेदनाव्दारे वलवाडी येथील रहिवाशांच्यावतीने प्रमुख पदाधिकार्यांनी उपायुक्त गणेश गिरी यांना दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे महानगरपालिका क्षेत्रात धुळे ग्रामीण मतदारसंघातील दहा गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. समाविष्ट झाल्यापासून येथील रहिवाशांना अनेक प्रशासकिय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध परवानग्या व आवश्यक कागदपत्रांसाठीही महानगरपालिकेच्या कार्यालयाचे हेलफाटे मारावे लागत आहेत. दरम्यान महापालिका क्षेत्रात समाविष्ट वलवाडीसहित दहा गावातील नागरीकांना घर आणि व्यवसायासाठी दुकान बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळत नाही.

तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि 8 अ चा उताराही मिळत नाही म्हणून घर व व्यवसायासाठी दुकानांचे बांधकाम करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी उपायुक्त गणेश गिरी यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी माजी आ.प्रा. शरद पाटील, माजी पं.स.सदस्य छोटूभाऊ चौधरी, वलवाडी माजी सरपंच भटू चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले,वाल्मीक वाघ,गुणवंत वाघ,दिनेश पाटील, भूषण सोनार,रविंद्र बाविस्कर,प्रविण देवरे आदी उपस्थित होते.

मनपा हद्दीतील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरीकानां घर आणि दुकांनाच्या बांधकामासाठी परवानगी देण्याबाबत धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांचे पत्र वलवाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना दिले आहे. शिष्टमंडळात माजी पं.स.सदस्य छोटूभाऊ चौधरी,वलवाडी माजी सरपंच भटू चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले,वाल्मीक वाघ,गुणवंत वाघ यांचा समावेश होता.
