बातमी कट्टा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, धुळे ग्रामीण आणि अपर तहसील कार्यालय, धुळे शहर यांच्यातर्फे सोमवारी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवरून तिरंगा रॅली काढली.
उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून रॅलीला सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, गणपती मंदिर, शिवतीर्थ चौक, रेल्वे स्थानक, एकात्मता चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तहसील कार्यालय, धुळे मार्गे निघालेल्या या रॅलीचा समारोप उपविभागीय अधिकारी कार्यालयात झाला.
या रॅलीत तहसिलदार गायत्री सौंदाणे, अपर तहसिलदार संजय शिंदे यांच्यासह या कार्यालयातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.