बातमी कट्टा महेंद्र राजपूत:- महिन्याभरापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच गावातील तब्बल १२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती यातील एका १२ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती.त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.मात्र काल त्याला त्रास जाणवू लागल्याने पुन्हा उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्या १२ वर्षीय मुलाचा आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील हातनुर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडला होता. दि २ फेब्रुवारी रोजी सकाळी हातनुर गावातील १२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतला होता.यातील १२ वर्षीय विराज सयाजी जगताप याच्या चेहऱ्यावर कुत्र्याने चावा घेतल्याने विराज गंभीर जखमी झाला होता.त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विराजची प्रकृती सुधारल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते.मात्र घटनेच्या एक महिन्यानंतर विराज याला पुन्हा रेबीजचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी दिली आहे.शवविच्छेदन अहवालानंतरच विराजच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. १२ वर्षीय विराज हा घरातील एकुलता एक मुलगा होता.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


