बातमी कट्टा:- कडाक्याच्या थंडीत नवजात मुलीस उघड्यावर सोडून आईने पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीस बालरोग तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले. या घटनेमागील अमानुषपणा लक्षात घेता मुलगी अनैतिक संबंधातून जन्माला आली असावी किंवा मुलगी नको असल्याच्या कारणावरून तिला टाकून दिले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
खान्देशभरात सुप्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील मंगळग्रह मंदीर परिसरात हा प्रकार घडला. तेथील 10 नंबरच्या दुकानाच्या छतावर गोधडीत गुंडाळून टोपलीत ठेवलेली बालिका सकाळी आढळली. थंडीमुळे तिचे शरीर गार पडले होते. नागरिकांनी तिला तातडीने बालरोग तज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांच्या रुग्णालयात दाखल केले. बालिकेच्या रक्तातील साखर कमी झाली असून शरीराचे तापमान खालावल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या माहितीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.