
बातमी कट्टा: शिरपूर शहरात भटक्या श्वांनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक चौकात ४ ते ५ श्वानांच्या टोळ्या दिसून येत असून या श्वानांकडून नागरिकांवर व वाहनचालकांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. अनेक वाहनचालकांना या श्वानांमुळे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील काही युवकांनी आज मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे, त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने श्वानांची प्रतिमा भेट देऊन शहरातील वाढत्या श्वानसंख्येवर नियंत्रण आणण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, “प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेऊन शहरात श्वान पकड मोहीम राबवावी व नागरिकांना दिलासा द्यावा.”
विजय स्तंभावर होणाऱ्या विद्रुपीकरणाबाबतही नाराजी — कारवाईची मागणी
शहराच्या मध्यवर्ती भागातील विजय स्तंभ, जो शिरपूरचा इतिहास आणि गौरवाचे प्रतीक मानला जातो, त्यावर काही काळापासून थेट बॅनर लावण्याचे प्रकार सुरू आहेत. प्रशासनाने कारवाईसाठी नोटीस लावल्यावरही वारंवार बॅनर लावले जात असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
“विजय स्तंभ हा आपल्या क्रांतीकारकांच्या शौर्याचे प्रतीक आहे. त्यावर असे बॅनर लावून विद्रुपीकरण करणे योग्य नाही. या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,” अशी मागणी नयन माळी, राज वाघ, पवन राजपूत, पृथ्वीराज लोहार, हिमेश चौहान आणि अक्षय राजपूत आदी युवकांनी केली आहे.