लाच स्विकारतांना धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) सह वरिष्ठ साहाय्यक एसीबीच्या ताब्यात

बातमी कट्टा:- तक्रारदाराकडून एकुण 91 हजारांची लाचेची मागणी करुन त्यातील पहिला टप्पा 35 हजार रुपयांची लाच स्विकारतांंना धुळे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे वरिष्ठ साहाय्यक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा, रामपुरा ता. शिरपुर, जि. धुळे येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची पेसा मधुन नॉनपेसा मध्ये बदली होणेकरीता, मा. उच्च न्यायालय खंडपीठ. औरंगाबाद कडून आदेश पारित झाले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.धुळे यांच्याकडे बदली होणेकरीता विनंती अर्ज सादर केला होता. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी “सहानभूतीपुर्वक विचार करावा” असा शेरा मारून सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीस्तव राकेश दिनकर सांळुखे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धुळे यांचे कडे पाठविला होता.

त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी शिक्षणाधिकारी राकेश सांळुके यांची भेट घेवून त्यांच्या बदली अर्जावर कार्यवाही करण्याकरीता पाठपुरावा करीत होते.त्यादरम्यान शिक्षणाधिकारी सांळुखे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचा बदली अर्ज शिफारशीसह उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठविण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय गोरख पाटील यांनी तक्रारदार यांच्या बदली अर्जावरुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), श्री. महाले, कार्यालयीन अधिक्षक (सा.प्र.), पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांचेकरीता ६६ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, शिक्षणाधिकारी राकेश सांळुखे (प्राथमिक) यांनी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रुपये मागणी करुन वरिष्ठ सहायक विजय पाटील यांना भेटण्यास सांगितले. तसेच वरिष्ठ सहायक, विजय पाटील यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), श्री. महाले, कार्यालयीन अधिक्षक (सा.प्र.), व इतर कार्यालयीन कर्मचारी यांचेकरीता ६६ हजार रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ५१ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य करुन पहिला हप्ता ३५ रुपये स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुध्द धुळे शहर पोस्टे जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश आहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: