

बातमी कट्टा:- घराच्या अतिक्रमणाची नोंद कमी होऊन घराचे नमुना ८ उताऱ्यावर नोंद व्हावी यासाठी ४ हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणी सरपंच पती, ग्रामविकास अधिकारी रोजगार सेवकसह लिपीकला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार यांनी मौजे ग्रामपंचायत फागणे येथे मालमत्ता क. ६५१ (मिळकत क. २०२५) क्षेत्र ४५० चौ. फुटाचे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे. सदर घराच्या नमुना नं.८ उताऱ्यामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमण अशी नोंद असुन भोगवटादार म्हणून तक्रारदार यांच नावाची नोंद आहे. त्यांनी शासकिय जागेवर केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणा नुसार नियमाकुल करण्यात आले आहे. परंतु त्यांचे घराचे नमुना नं.८ च्या उताऱ्यावर मालकी सदरात अदयाप सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्याने त्यांना सदर जागेवर बँकेकडुन गृहकर्ज मंजुर होत नाही.

त्यांच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होवुन अदयावत नमुना नं.८ घराचा उतारा मिळणे करीता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील व सरपंच पती नगराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय, फागणे येथे जावुन भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्या घराच्या नमुना नं.८ वरील अतिक्रमण नियमाकुल झाल्याची नोंद करून अदयावत उतारा देणे करीता तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याने केल्याची तकार ला. प्र. विभाग, धुळे कार्यालयात दि. १५.०७.२०२४ रोजी समक्ष येवुन दिली होती.

त्या अनुषंगाने दि. १६.०७.२०२४ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता सरपंच पती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील यांना ४,०००/-रु. लाच देण्याकरीता प्रोत्साहन (अपप्रेरणा) दिले. तसेच दि. १८. ०७.२०२४ रोजी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ४,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम लिपीक किरण शाम पाटील यांचे हस्ते स्विकारल्याने लोकसेवक भाउसाहेब नामदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी, फागणे, सरपंच पती नगराज हिलाल पाटील, लिपीक किरण शाम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरुध्द धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७-अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेडडी व वाचक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
