बातमी कट्टा:- एकीकडे मयत झालेल्या वडिलांचा मृतदेह घरात तर दुसरीकडे दहावीचा पेपर अशा संकटात सापडलेल्या हर्षल च्या मदतीस विखरण येथील ग्रामस्थ व साने गुरुजी विद्यालयातील कर्मचारी आले.अगोदर दहावीचा पेपर देण्यास पाठवून परीक्षा झाल्यानंतरच पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिरपूर तालुक्यातील विखरण येथील भाऊसाहेब झुलाल पवार वय ५० वर्षे यांचे दिनांक ६ मार्च २०२३ रोजी पहाटे निधन झाले.घरात दुःखाचा डोंगर पसरला होता,अंत्यविधी तसेच अंत्यदर्शनासाठी नातेवाईक तसेच ग्रामस्थ जमा होत होते.यावेळी भाऊसाहेब पवार यांचा एकुलता एक मुलगा हर्षल याची दहावीची परीक्षा चालू असून,आज सोमवारी इंग्रजी विषयाचा पेपर असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. वडिलांच्या मृत्यू नंतर हर्षल याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,म्हणून हर्षल याला दहावीच्या परीक्षेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.
यानंतर हर्षल याला साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक विद्यालय विखरण येथे परीक्षेसाठी पाठवण्यात आले.
पेपर चालू असताना हर्षलला विद्यालयाचे आजी माजी मुख्याध्यापक,पर्यवेक्षिका तथा परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालिका उपकेंद्र संचालक विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी धीर दिला.
पेपर पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.