
बातमी कट्टा(अवतार):- शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या कृतीतून वेळोवेळी याचा परिचय दिला असला तरीही; जिल्हा परिषद अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून शिस्त कशी बिघडली? हे या घडीला पडलेले जटील कोडे. तसेही, धक्कातंत्राचा वापर अलिकडच्या काळात भाजपच्या राजकरणाचा भाग बनला असून, हेच सूत्र अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत अंगीकारल्याने यावेळचा झटका जिल्हा परिषद सदस्यांनाच अधिक बसल्याने त्यांनीही आता ‘दगडापेक्षा विट मऊ’ मानून घेतली हेच खरे.
मोदी लाटेच्या उदयानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यात भाजपचा वारु चौखूर उधळला. इनमिन चार तालुक्यांच्या जिल्ह्यात तेव्हापासून काँग्रेसच्या बालेकिल्याचे एकएक बुरुज ढासळू लागले. काँग्रेसचा पारंपरिक मतदारच नव्हेतर त्यांच्या म्हणविल्या जाणाऱ्या नेत्यांनाही आपल्या बाजूने वळविण्यासह गोटात सामिल करून घेण्याची अकल्पित किमया भाजपने करून दाखविली. पूर्वी शहरी भागापुरताच मार्यादीत राहिलेल्या भाजपने सांप्रतकाळात ग्रामीण भागात आपली पायेमूळे घट्ट केली. इतिहासात पहिल्यांदाच धुळे जिल्हा परिषदेवर भाजपने मिळविलेली एकहाती सत्ता याचाच परिपाक म्हणवा लागेल. पक्ष वाढला आणि सत्तेची सूत्रे हाती आल्यावर आकांक्षा आणि महत्वाकांक्षांना आपसूकच बळ मिळते. त्या तडीस नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आणि मग गटबाजी उदयास येते.
भाजपची जिल्हा परिषदेतील वाटचाल आजघडीला याच स्थित्यंतरातून कूच करत असल्याचे पहायला मिळते. याचे संकेत सुरुवातीच्या अडीच, पावणेतीन वर्षे अध्यक्षपदी विराजमान असलेल्या बोराडीकरांच्या सत्ता काळातच मिळाले. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून पंक्तिप्रपंच करत असल्याने त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी बोराडीकरांविरुद्ध मोर्चा उघडत आपल्या पक्ष नेतृत्वासमोर घसा कोरडा केल्याचे आपण सर्वांना ज्ञात असेलच. तेव्हा निर्मित झालेली गटबाजीची ठिणगी तुर्त अधिकच तप्त झाली असून, यामुळे वर्तमानकाळात अध्यक्षपदी विरामान असलेल्या आणि फागणेकर झालेल्या इंजिनिअरबाईंचे हात चांगलेच पोळत आहेत. इंजिनिअरबाईंना अध्यक्ष पदावरून पायउतार करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील सदस्यांसह गटप्रमुखांनी पक्ष नेतृत्वासह अगदीच नागपूरकरांच्या दरबारात कंठशोष केला. नागपूरकरांनी भलेपणा दाखवत अविश्वास ठराव आणण्याची इशारत करून नाराज गटाला मधाचे बोट लावले. याने उसने बळ मिळालेल्या रुष्ट वर्गाने अविश्वास दाखविण्याची खुण गाठ मनाशी बांधली; पण, पुढे काय वाढून ठेवले असेल याची पुसटशी कल्पना ते करू शकले नाहीत. अध्यक्ष बदलाच्या वावटळीत स्वत:चे इप्सीत साध्य करून घेण्यासाठी बोरीसकरबाईंनी गुजरातेत सुरतेच्या आपल्या माहेरी अध्यक्षपदाचा सांगावा धाडल्याची जिल्हा परिषदेच्या गोटात आवई उठल्याने रुष्ट गटाच्या तोंडचे पाणी पळाले. बोरीसकरबाईंचे तीर्थरुप म्हणजे गुजरातेत भाजपचे सरसेनापती. त्यांच्या वरदहस्ताने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बोरीसकरांना मिळाल्यास आपलेच काय तर जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वाचे सिंहासन देखील डळमळीत होवू शकेल; याची कल्पना आल्याने आणि थेट सुरतेवरून होणाऱ्या स्वाऱ्या परवडणाऱ्या नाहीत; याचा आत्मबोध झाल्यानेच ‘दगडापेक्षा विट मऊ’ मानून घेत भाजपच्या नाराज सदस्यांनी इंजिनिअरबाईंना अध्यक्ष पदावरून पायउतार करण्याचा आपल्या निश्चियावर उदक सोडल्याचे मानले जात आहे. राहिला प्रश्न शिस्तीचा तर उंबरठा ओलांडणाऱ्या शक्तींना अटकाव करण्यात भाजप मागेपुढे पाहत नाही; याचे उदाहरण जळगावातील मुक्ताईनगर आणि धुळ्यातील मल्हार बागेकडे पाहिल्यावर मिळू शकेल; असे असेल तर १३ महिन्यांचा कालावधी ठरवून दिला असताना पक्ष नेतृत्वाचा आदेश न मानणाऱ्या इंजिनिअरबाईंना मोकळीक कशी? हा कूटप्रश्न अनुत्तरीत राहतो.