
बातमी कट्टा :- भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा नेतृत्वाखाली शिरपूरात भाजपा तर्फे वीजटंचाईच्या विरोधात कंदील आंदोलन करुन भारनियमन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. येथील भाजपा कार्यालय ते विजयस्तंभ, आंबा बाजार ते भाजपा कार्यालय असे कंदील आंदोलन दि २४ एप्रिल रोजी संध्याकाळी करण्यात आले. यावेळी तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ हातात कंदील घेऊन आंदोलन केले.

आंदोलन प्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, खंडेराव बाबा संस्थान उपाध्यक्ष संजय आसापुरे, शिरपूर तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आकाश मराठे, शहराध्यक्ष विक्की चौधरी, नितीन गिरासे, मन की बात कार्यक्रम तालुका सह संयोजक अजिंक्य शिरसाठ, जितेंद्र पाटील हिंगोणी, रविंद्र राजपुत, पप्पु राजपुत, राजुलाल मारवाडी, नंदु माळी, शुभम शिरसाठ, वसंत माळी, गणेश माळी, संतोष माळी, अजय मराठे, अविनाश शिंपी, अतुल सोनार, गणेश शिंपी उंटावद आदिंसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, सरकारच्या या स्वार्थीपणामुळे सामान्य वीज ग्राहकावर भारनियमनाचे संकट ओढवले आहे. कोळसा टंचाईमुळे औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती कमी झाल्याचे कारण पुढे केले जात असले तरी त्यास आघाडी सरकार आणि महानिर्मिती कंपनीचा धोरणशून्य कारभारच जबाबदार असताना त्याचा फटका दरवाढीच्या रूपाने सामान्य ग्राहकांवर लादणारे सरकार माणुसकीशून्य आहे, अगोदरच भारनियमनामुळे व अनियमित वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त आहे. वेळेवर व हमीपूर्वक वीजपुरवठा होत नसल्याने शेतातील पिके पाण्या अभावी करपण्याच्या चिंतेने शेतकऱ्यास ग्रासले आहे. रात्री अपरात्री केव्हाही अनियमितपणे होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी कुटुंबांची झोप उडाली असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले.
