
बातमी कट्टा:- शिरपूर जिल्हा धुळे येथील मल्टीस्टेट साखर कारखाना मागील 10 ते 12 वर्षांपासून बंद आहे. यामुळे शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, शेतमजुर, व व्यापारी चातकासारखी कारखाना कधी सुरू होईल आणि पुन्हा सुगीचे दिवस कधी येतील याची शिरपूर तालुक्यातील सर्वच लोक वाट पहात आहेत.

मात्र मागील निवडणुकीत गाजा वाजा करून निवडून आलेले संचालक मंडळ यांनी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात मागील 5 वर्षात काहीएक हालचाल न केल्याने कारखाना सुरू होऊ शकला नाही. आज देखील तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस तोडला गेला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत म्हणून काहीही करून साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा देशाचे मा. कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शिरपूर तालुक्यातील सहकारी मल्टीस्टेट साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली. महविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी सहकार मंत्री यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याचे सांगितले.

खा. शरद पवार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांनी दि.15 रोजी 11:30 वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित अधिकारी यात प्रामुख्याने अप्पर मुख्य सचिव सहकार व पणन, साखर आयुक्त पुणे, डॉ.जितेंद्र ठाकूर, प्रादेशिक साखर सह संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे, नंदुरबार मध्यवर्ती बँक, व अवसायक शिरपूर सहकारी साखर कारखाना शेतकरी संघर्ष समिती सदस्य,पदाधिकारी यांना बैठकीस बोलवून शिरपूर साखर कारखाना भाडे तत्वावर सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.
शिरपूर साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात डॉ जितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांना विनंती करून सांगितले की, शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि विकासाचा कणा असलेला सहकारी कारखाना सुरू झालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिरपूर तालुक्यातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. शरद पवार डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले .शिरपूर तालक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करून पक्षभेद विसरून शेतकरी हितासाठी साखर कारखाना सुरू करण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, शेतकरी संघटना, कामगार संघटना, व्यापारी संघटना यांना एकत्र येण्याचे आवाहन या माध्यमातून डॉ जितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.