बातमी कट्टा:- संपूर्ण शिरपूर तालुक्यात 100 टक्के दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार काशिराम पावरा यांनी केली.
शिरपूर तालुका 100 टक्के दुष्काळी जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शिरपूर तहसिलदार कार्यालयात बुधवारी दि. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी,भाजपा विभाग संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवासी नायब तहसिलदार गणेश आढारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आ. काशिराम पावरा पुढे म्हणाले की, संपूर्ण शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. कोरडवाहू शेती करणारे शेतकरी बांधव पूर्णपणे कोलमडून पडले आहेत. बागायतदार शेतकरी देखील हताश झाले आहेत. यावर्षी अर्धा पावसाळा निघून गेला तरी देखील आवश्यक असा पाऊस झालाच नाही. वरूण राजाने शिरपूर तालुक्यातील बळीराजा वर अवकृपा केली आहे. शेतकरी बांधव व तालुक्यातील जनता पावसाअभावी उदास झाली आहे. शेतकरी बांधवांची पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. तसेच पाऊस नसल्याने सर्व व्यवहारांवर, व्यापारी वर्गावर, सर्वसामान्य जनतेवर विपरीत परिणाम झालेला आहे. तालुक्यात पाऊस नसल्याने सर्वच पिके कोमेजून गेली असून पिके हातातून गेली आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला बळीराजा हा पुन्हा मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाने गेल्या काही वर्षांपासून बळीराजावर सातत्याने अवकृपा केली आहे. कधी गारपीट, तर कधी अवकाळी पाऊस तर आता गेल्या दोन महिन्यात पाऊसच नाही. निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले असून शेतकरी राजा हा शेती व पिकां प्रमाणेच पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. शेती करणे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांना परवाडणारी राहिली नाही. कोरोनाच्या संकटात सापडलेली जनता गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीनंतर आता दुष्काळाच्या गर्तेत सापडली आहे. कोरोना व दुष्काळामुळे शेती उद्ध्वस्त झाली व सर्वसामान्यांचे व्यवसाय ठप्प झाले. जनता हवालदील झाली आहे. सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होवून शासनाने शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी. शेतकरी व जनतेच्या आर्थिक संकटाची तातडीने दखल घेऊन शिरपूर तालुक्यात 100 टक्के दुष्काळ जाहीर करावा. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार काशिराम पावरा यांनी केली.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले, तालुक्यात पाऊस नसल्याने फारच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने वेळीच दखल घेवून शेतकरी बांधवांना तातडीने मदत करावी. दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा, यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील म्हणाले, खरीप पिकांचे आयुर्मान संपले आहे. पावसाअभावी केळी, ऊस, पपई इ. अनेक फळपिकांची वाढ होवू शकली नाही. खरीपाची आणेवारी लागण्याच्या काळापर्यंत पिकांची उगवण कोंब अवस्थेतच कोमेजली. मका, मूग, उडीद, बाजरी, कपासी, नाचणी, ज्वारी, सोयाबीन, तीळ, पावसाळी टमाटे, भेंडी, भाजीपाला पिके पूर्णपणे नष्ट झाले आहेत. शिरपूर तालुका १०० टक्के दुष्काळी जाहीर करावा.
कृउबा सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया यांनी तालुक्यात पर्जन्यमानच नसल्याने शासनाने योग्य आणेवारी घोषित करण्याची मागणी केली.
शहराध्यक्ष हेमंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. निवासी नायब तहसीलदार गणेश आढारी यांनी निवेदन स्विकारुन शासनाकडे लगेचच योग्य अहवाल पाठवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री सो. महाराष्ट्र राज्य तसेच विरोधी पक्षनेता विधानसभा, महाराष्ट्र राज्य व विरोधी पक्षनेता, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी धुळे यांनाही पाठविण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देतांना आमदार काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, विभाग संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, जि. प. सदस्य देवेंद्र पाटील, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, रमण पावरा, प्रा. संजय पाटील, भरत पाटील, विजय पारधी, योगेश बादल, भिमराव ईशी, ॲड. बाबा पाटील, भटू आप्पा माळी, अविनाश पाटील, कैलास पावरा, मंगेश भदाणे, जितेंद्र सूर्यवंशी, सुनिल चौधरी, भूपेश परदेशी, जगन टेलर, जगतसिंग राजपूत, भालेराव माळी, मनजीत पावरा, आकाश मराठे, प्रशांत चौधरी, विक्की चौधरी, महेंद्र पाटील, अनिल बोरसे, विशाल धनगर, मुकेश पाटील, रवि राजपूत, पप्पू राजपूत, जयपाल राजपूत, शिवदास पावरा, गुलाब राठोड, पिंटू जाधव, चंद्रकांत जाधव, सर्जन पावरा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.