
बातमी कट्टा:- शिरपूर शहरात आज सकाळच्या सुमारास रामसिंग नगर भागातील एका पडीत जागेवर नवजात स्त्री जातीचं मृत अर्भक आढळून आलं आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर अर्भक एक ते दोन दिवसांचं असल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
मृत अर्भकाला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अर्भक स्त्री जातीचं असल्यामुळे मुलगी जन्मल्यानंतर तिला टाकून देण्यात आली का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून शहरातील रुग्णालयांमध्ये तपासणी आणि चौकशी सुरु असून, अर्भक कुणाचं आहे याचा शोध घेण्यासाठी शिरपूर पोलिसांचा तपास सुरू आहे.