“शेतकरी बांधवानो, तुम्ही एकटे नाहीत” – खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा शेत शिवारात धीराचा दिलासा..!

बातमी कट्टा:- “शेतकरी बांधवानो, या संकटात तुम्ही एकटे नाही. काँग्रेस पक्ष आणि मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तुमच्या मेहनतीचा, तुमच्या अश्रूंचा, तुमच्या हक्काचा आवाज थांबू द्यायचा नाही.” – हे शब्द आहेत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे, जे त्यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट शेतात भेट देत दिले. महाराष्ट्र राज्यासह धुळे लोकसभा मतदार संघातील अनेक तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावांतील पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत हताश, निराशा, आणि असहायतेचा आक्रोश स्पष्ट दिसत आहे. अशा स्थितीत धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवून धीर दिला.

खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे तालुक्यातील नाणे, सिताणे, नंदाळे, बोरकुंड, शिरूड व शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव, वसमाने, कडगाव-कुंभारे, लंघाणे, रंजाणे या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात उतरून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. पिकांमधील पाण्यात उभं राहून त्यांनी शेतकऱ्यांची वेदना समजून घेतली. एका वृद्ध शेतकऱ्याने सांगितले, “आईसारखी खासदार भेटली आज, परिस्थिती काहीही असो आज आपण एकटे नाही हे जाणवलं.” यावेळी कापूस, सोयाबीन, मका, कांदा, पपई सारख्या अनेक पिकांचे नुकसान झालेले दिसून आले. शेतकऱ्यांनी यावेळी पिकांची अवस्था, झालेले नुकसान, पंचनाम्यांतील अडचणी आणि विमा दाव्यांबाबतच्या विलंबाची माहिती दिली. काही गावांमध्ये शेतजमिनीवर अजूनही पाणी साचलेले असून, पिके सडून गेल्यामुळे पुन्हा लागवड करणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. बच्छाव म्हणाल्या, “हे फक्त निसर्गाचे नव्हे, शासनाच्या दुर्लक्षाचेही संकट आहे. “शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी प्रति हेक्टर रुपये ५०,०००/- च्या मदतीची मागणी राज्य शासनाकडे केली असून, पाहणी अहवाल काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे जमा करणार आहोत आणि त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन केंद्र व राज्य शासनावर प्रति हेक्टर रुपये ५०,०००/- च्या मदतीसाठी दबाव आणला जाईल आणि हा दौरा केवळ राजकीय दौरा नव्हता तो एक भावनिक आणि मानवी दौरा होता, जिथे एका लोकप्रतिनिधीने लोकांचे दुःख समजून घेतले, त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून संवाद साधला, आणि त्यांच्या मनात एक आशा निर्माण केली असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्या दरम्यान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह उपविभागीय अधिकारी श्री. रोहन कुवर, मंडळ अधिकारी श्री. निलेश सांगळे, स्वप्नील शिंदे, सुजित मोरे, कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, कार्याध्यक्ष गुलाब दादा कोतेकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हाजी साबीर शेठ खान, डॉ. दिनेश बच्छाव, कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, धनराज पाटील, जनार्दन भैय्या देसले, भुरा फौजी राजपूत, रुपा राजपूत, बाळासाहेब पाटील, रवींद्र चौधरी, दीपक पाटील, राहुल माणिक, महेंद्र पाटील, राहुल सैंदाणे कोळी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: