शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण ? जबाबदार असणाऱ्या “त्या” ठेकेदारांवर कारवाई करा !

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना संघटनेचे प्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी आज दिनांक 22 मार्च रोजी शिरपूर शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या कार्यालयाला शिष्टमंडळासह भेट देऊन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाई जबाबदार कोण? ती नुकसान भरपाई आपण कशी भरून काढणार? शेतकऱ्यांना कोणते लाभ देणार? व आगामी काळात कोणत्या प्रकारच्या सुधारणा करणार? याबाबत जाब विचारून संबंधित दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.


या निवेदनाद्वारे असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की शिरपूर तालुका हा शेती प्रधान तालुका असून सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने तापमानात वाढ झाली आहे शिवाय अनेक शेत शिवारातून जाणाऱ्या वीज मंडळाच्या तारा या लोंबकळत असल्याने व त्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने या विजेच्या तारा मुळे शॉर्टसर्किट होऊन शेकडो एकर उभ्या पिकांचे व उसाच्या पिकांचे जळून नुकसान झाले आहे. तालुक्यातील थाळनेर, बाभुळदे,अर्थे,जातोडे, अजंदे, भावेर, कलमसरे, दहिवद इत्यादी भागात शॉर्ट सर्किटमुळे पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .मात्र सदरच्या घटना या कामासाठी देखरेख व दुरुस्तीसाठी दिलेल्या ठेकेदार एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे होत असून वीज मंडळाने तात्काळ या ठेकेदारावर कारवाई करून त्याचा कंत्राट रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यात होत असलेल्या नुकसान यामुळे शेतकरी अडचणीत आला असून आत्महत्येच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे या सर्व घटनांना बेजबाबदारपणे कारभार करणाऱ्या ठेकेदारास जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. यापुढे या ठकेदारास कोणतेही कंत्राट देऊ नये अशी देखील सूचना करण्यात आली आहे .आगामी काळात उन्हाच्या प्रमाणात व तापमानात वाढवण्याची शक्यता असल्याने तालुका भरात शेत शिवरातून जाणाऱ्या विज तारांचा अहवाल तयार करून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. व ठेकेदारावर केलेल्या कारवाईचा अहवाल महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना शाखा शिरपूर यांना देण्यात यावा अन्यथा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे नुकसान व त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्याचे वतीने, जागृत जनमंच, मानव एकता पार्टी, शेतकरी विकास फाउंडेशन आणि भारतीय पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल व याची जबाबदारी महावितरण कंपनीची असेल असेदेखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या या आंदोलनाला मानव एकता पार्टी संस्थापक अध्यक्ष राजे सुभाष सिंह जमादार ,व कल्पेश सिंह जमादार यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे .सदरच्या निवेदनावर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे तालुका अध्यक्ष गोपाल मारवाडी, कार्याध्यक्ष मोहन पाटील, तालुका उपाध्यक्ष एडवोकेट गोपालसिंग राजपूत, शहराध्यक्ष हेमराज राजपूत, तालुका सचिव कल्पेश जमादार ,शहर प्रमुख ओकार आबा जाधव ,प्रसिद्धीप्रमुख राजेश मारवाडी, तालुका संघटक राजकुमार जैन, मुख्य संयोजक महेंद्र सिंग राजपूत, तालुका संयोजक मिलिंद पाटील, शहर उपाध्यक्ष संजय आसापुरे ,नगरसेवक हेमंत पाटील ,शेतकरी भरत राजपूत व धुळे जिल्हा जागृती मंचच्या अध्यक्ष डॉक्टर सरोज पाटील यांच्या निवेदनावर सही आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: