
बातमी कट्टा:- कंपनीत काम करीत असतांना तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा जीव गेल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.तर मृत्यूचे कारण मात्र अद्याप कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नाही.याबाबत सोनगीर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून मृत तरुणाच्या कुटुंबाला मोबदला मिळावा यासाठी ग्रामस्थांनी नगाव येथील आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला होता.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील देवभाने येथील समाधान सुभाष झालटे हा 24 वर्षीय तरुण देवभाने शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील बी.आर.फॅशन कंपनीत गेल्या आठ वर्षांपासून याठिकाणी कामाला होता.मात्र दि. ३१ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास काम करीत असतांना समाधान झालटे हा जमिनीवर कोसळला.जमिनीवर कोसळल्यानंतर समाधान याचा जागीच मृत्यू झाला.यावेळी कंपनीत काम करणारे तरुणांनी समाधानला प्राथमिक उपचारासाठी नगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मात्र याठिकाणी समाधान हा मृत झाल्याचे निष्पन्न झाले.प्रेस मशीनचा विजेचा जबर धक्का बसल्याने समाधान झालटे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून बी.आर.फॅशन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा जीव गेला असल्याचा आरोप समाधान झालटे यांच्या नातेवाईकांनी केला. कंपनीत काही कारणांमुळे वीज प्रवाह उतरत होता. मात्र मेन्टेन्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.मात्र याबाबत कंपनी प्रशासनाकडून मृत्यूचे कारण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

मृत समाधान झालटे यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी नगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या मांडला होता.यावेळी बी.आर.फॅशन कंपनीचे मालक अनिल कचवे व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक वाद झाले. यावेळी समाधान झालटे या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कंपनीवर कारवाई व नुकसान भरपाईची मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे.