
बातमी कट्टा:- सणासुदीच्या दिवशीच शॉर्टशर्कीट मुळे आग लागल्याची घटना आज दि 10 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्यसह एक लाखापेक्षा जास्तची रोकड जळून खाक झाल्याचे घटनास्थळी सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील शिंगावे शिवारात असलेल्या वाघेश्वरी कॉलनीत आज दि 10 रोजी सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास घराला आग लागल्याची घटना घडली आहे.वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या कैलास राजू बाबर हे पत्नी व दोन मुलांसोबत गोरख आधार पाटील यांच्या मालकीच्या घरात भाडेतत्त्वावर राहतात.
कैलास बाबर यांची पत्नी व दोन्ही मुले गावी गेले होते.कैलास बाबर आज सकाळी अंघोळ वगैरे करुन घर बंद करून कॉलनी परिसरात गेले असतांंना अचानक घराला आग लागल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले.यावेळी अग्निशमन बंबच्या मदतीने आग आटोक्यात आली.मात्र यावेळेत संपूर्ण घर जळून खाक झाले.कैलास बाबर यांच्या सांगण्यावरून नवीन मोटरसायकल घेण्यासाठी घरात एक लाख 17 हजारांची रोकड ठेवण्यात आली होती.या आगीत रोकडसह फ्रिज,टिव्ही, कुलरसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.घटनास्थळी प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.ऐन सणासुदीच्या दिवशीच संपूर्ण घर डोळ्यासमोर जळून खाक झाल्याने कैलास बाबर यांच्या डोळ्यात पाणी आले होते.