
बातमी कट्टा:- धुळ्यातील मोराणे उपनगर शिवारातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीतील कापसाला आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली असून आठ ते नऊ लाखांचा कापूस जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे.

धुळे येथील मोराणे शिवारातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीतील कामगारांची आज सकाळी आठला शिफ्ट सुरू झाली.यावेळी स्पिनिंग विभागाजवळील मशिनच्या गुदामात मशिनवर कामकाज सुरू होते.यावेळी अचानक येथील कापसाला आग लागली. क्षणार्थात आगीने रौद्र रूप धारण केले.या आगीत गुदामाजवळील व आजूबाजूच्या कापसानेही पेट घेतला.

कर्मचान्यांनी जवाहर सूतगिरणीच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सूतगिरणीच्या पथकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे धुळे महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देत घटनास्थळी महापालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.या आगीत जवाहर सूतगिरणीचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.सुदैवाने जिवीतहानी टळली.
