बातमी कट्टा:- एकुलता एक मुलगा देशसेवेत भरती होऊन देशसेवा करेल असे स्वप्न आई वडील बघत होते.आणि मुलाची देखील सैन्यात भरती होण्याची जिद्द होती.नेहमी प्रमाणे तो सुरत नागपूर महामार्गावर धावण्याच्या सरावसाठी गेला होता.मात्र नियतीने घात केला आणि अज्ञात भरधाव वाहनाने मागून धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
धुळे जिल्ह्यातील नेर येथील जयेश अशोक भोई हा रोजच मित्रांसोबत सैन्यभरतीची तयारी करत होता.सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते.तीन दिवसांपूर्वी जयेश भोई हा सुरत नागपूर महामार्गावर धावण्याच्या सरावासाठी निघाला या दरम्यान त्याला पाठीमागून अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने खाली कोसळला.गंभीर अवस्थेत जयेश भोई याला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र गंभीर दुखापत असल्याने जयेशला मुंबई येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.मात्र काल दि २० रोजी जयेशचा मृत्यू झाला.
जयेश भोई यांच्या कुटूंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून जयेश भोई याच्या उपचारासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली होती.मात्र त्याचा मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरताच गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार होत.