बातमी कट्टा:- सावकारांकडून त्रास दिला जात असल्याने २० वर्षीय तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सोशल मिडीयावर आत्महत्या करत असल्याबाबत नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील क्रांतीनगर भागातील दुर्गेश दीपक धनगर (बंटी)या 20 वर्षीय तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि 27 रोजी सायंकाळी घडली आहे.दुर्गेश धनगर याने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर आई आणि भाऊवर कर्ज असून ते कर्जवाले खूप त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याबाबत मजकूर लिहून स्टेटस ठेवले होते.
आत्महत्येबाबत स्टेटस ठेवल्याचे बघून खळबळ उडाली सर्वत्र त्याचा शोध घेण्यत आला मात्र दुपारी तीनला सावळदे येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकताना त्याला काहींनी पाहिले. त्यानंतर लगेचच त्याचा शोध सुरु झाला. सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह हाती लागला.मयत अवस्थेत दुर्गेश धनगर याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. सावकारांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून दुर्गेश धनगरने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे.


