स्वयंभू शिवलिंगास पंचधातूंयुक्त मुकुटस्थापना!

बातमी कट्टा:- कुरखळी ता शिरपूर येथे श्री तापीमाता उत्तरतट श्री. क्षेत्र कुरकटेश्वर महादेव मंदिरात पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने पंचधातूंयुक्त मुकुट स्थापना दि ९ ऑगस्ट रोजी संपन्न झाली.
             मुंबई – आग्रा महामार्ग क्र. ३ पासून अवघ्या २ कि. मी. अंतरावर असलेल्या कुरखळी गावाच्या दक्षिणेला असलेले कुरकटेश्वर महादेव मंदिर हे क्षेत्र प्रभू रामचंद्रांच्या काळातील असुन स्वयंभू शिवलींग येथे स्थापित आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांच्या काळात झाला आहे. त्यानंतर या तीर्थक्षेत्राला लाभलेले अनेक ऋषीमुनींपैकी पहिले व ज्यांच्या नावाने या गावाचे नाव अधोरेखित झाले ते प. पूज्य संत श्री. कुकुटस्वामीजी महाराज यांचे नंतर प. पूज्य संत श्री. प्रेमानंदजी सरस्वती महाराज यांच्यासह अनेक ऋषीमुनींचे येथे वास्तव्य होते. या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे खान्देशातील दुसरे व महत्वाचे श्री कार्तिकस्वामींचे मंदिर देखील आहे ते वर्षातून एकदा कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी खुले होत असते. महादेव मंदिराच्या शेजारील टेकळीवर राम मंदिरासाठी च्या नियोजित जागेवर अखंड हवनकुंड, कुटिया तसेच भाविकांसाठी सुसज्ज असे भक्त निवास बांधण्यात आले आहे.
                     दि ९ ऑगस्ट रोजी श्रावणमासाला सुरुवात झाली असून पहिल्याच सोमवार चे औचित्य साधून कुरखळी गावातील तरुणांच्या पुढाकाराने महादेव मंदिरातील स्वयंभू शिवलिंगावर्ती पंचधातूंयुक्त मुकुट स्थापन करण्यात आला. सायंकाळी ४ वाजे दरम्यान गावातून पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यात मिरवणुक काढण्यात आली होती, यासाठी कुरखळी गावातील तरुणांचे मोलाचे योगदान लाभले. पहाटे पासूनच मंदिर परिसर व गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
             कोरोना काळात कुरखळी गावावर झालेल्या आघातातून सावरण्याचे बळ मिळो, व यापुढे गावावरील संकट टळो यासाठी म्हणून महिला, पुरुष व गावातील तरुणांनी कुरकटेश्वर महादेवकडे यानिमित्ताने साकडं घातलं आहे.
             या तीर्थक्षेत्राला हजारो भाविक भेटदेत असतात. अनेक वर्षाची परंपरा असलेलं श्रीक्षेत्र कुरकटेश्वर महादेव मंदिरात दि. ९ ऑगस्ट रोजी जय सियाराम भक्त मंडळ कुरखळी व  ग्रामस्थांकडून प्रसादाचे नियोजन केले होते.
धार्मिक विधी व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ नये तसेच शासकीय नियमांचे पालन करीत आलेल्या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी तरुणांनी सहकार्य केले.
            

WhatsApp
Follow by Email
error: