बातमी कट्टा:- 28 लाख 80 हजार रुपयांची लाच घेतांना आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.अभियंता शिरपूर तालुक्यातील रहिवासी असून नाशिक शहरात उंटवाडी येथील नयनतारा या निवासस्थानी लाचेची रक्कम स्विकारताना एसीबीने अभियंताला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथे आदिवासी विकास विभागातर्फे मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहात सेंट्रल किचनचे काम आर. के. इन्फ्राकन्स्ट्रक्शन लि. या फर्मला मंजूर झाले असून एकूण दोन कोटी 40 लाखांचे हे काम होते. मात्र या कामाचे वर्क ऑडर आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल हे देण्यास टाळाटाळ करीत होते. संबंधित फर्मने पाठपुरावा केला असता त्यावेळी दोन कोटी 40 लाख रुपयांच्या 12 टक्के म्हणजे रक्कम 28 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी दि 19 ऑगस्टला अभियंता बागूल याने केली होती.
तक्रारदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली दि. 25 ऑगस्टला अभियंता बागूल याच्या घरी पैसे देण्याचे ठरल्याने लाचलुचपत विभागाने सापळा रचला.यावेळी दि 25 रोजी उंटवाडी येथील नयनतारा या निवासस्थानी लाच घेतांना 25 ऑगस्टला अभियंता बागूल याला रंगेहाथ पकडण्यात आले.