जिल्ह्यात रासायनिक खतांचा किती पुरवठा ? जाणून घ्या..

बातमी कट्टा: नंदुरबार जिल्ह्यास खरीप हंगाम 2021 करिता एकूण 96 हजार 20 मे.टन रासायनिक खतांचे आवंटन मजूर करण्यात आले असून त्यापैकी 23 हजार 342 मे.टन रासायनिक खताचा पुरवठा करण्यात आलेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी खरीप हंगामात एकूण खतापैकी युरीया खताचे 45 हजार 590 मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले असून आज अखेर 9 हजार 604 मे.टन युरीया प्राप्त झाला आहे.एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने मंजूर आवंटनाप्रमाणे खत प्राप्त होईल.

आतापर्यंत शेतकऱ्यांनी मागील हंगामातील शिल्लक व चालू हंगामातील प्राप्त असे एकूण जवळपास 12 हजार 941 मे.टन युरीया खताची खरेदी केली आहे. शेतकरी बांधवांनी एकाच वेळी पूर्ण हंगामात लागणारा युरीया खरेदी न करता पिकाच्या गरजेनूसार व वाढीच्या आवश्यकतेनुसार खरेदी करावा. अनावश्यक साठा करु नये, जेणेकरुन सर्वांना खत उपलब्ध होईल व तुटवडा जाणवणार नाही.

शेतकरी बांधवांनी खत खरेदी करतेवेळी आधार कार्ड घेवून जावे. शेतकऱ्यांनी खताच्या एकाच ग्रेडचा आग्रह न धरता उपलब्ध असलेल्या खतामधून आपली गरज भागवावी. पिकांना फक्त युरीया खताचीच आवश्यकता नसून इतरही घटक पिकांच्या वाढीसाठी व उत्पादन वाढीसाठी आवश्यक असतात हे विचारात घेवून युरीयासोबत कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रासायनिक खताचा प्रमाणात वापर करावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परीषद नंदुरबार यांनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: