बातमी कट्टा:- कर्तव्य बजावत असतांना गोळी लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत सहा महिन्यांपासून गुवहाटी येथील आर्मी रुग्णालय येथे उपचार सुरु असतांना मुळगाव सारंगखेडा जवळील कळंबु येथील भारतीय सैनिक निलेश अशोक महाजन यांना विरमरण आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत आहे.

संपूर्ण कुटुंबात देशासाठी लढण्याची जिद्द होती. वडीलांनी भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवा बजावली होती.काका देखील बि.एस.एफ मध्ये कर्तव्य बजावत असतांना 21 व्या वर्षी देशसेवेत शहीद झाले होते.कोणी डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न बघत असतांना नंदुरबार जिल्ह्यातील कळंबु येथील जवान निलेश अशोक महाजन यांनी देशाचे रक्षणासाठी देशसेवेत भरती होण्याचे स्वप्न बघितले होते. असे असतांना भारतीय जवान निलेश महाजन यांच्या लहानपणीच आई आणि वडलांचे निधन झाले.यामुळे जवान निलेश महाजन हे लहानपणापासून शिंदखेडा तालुक्यात मालपुर येथे मामांकडे राहत होते. दोंडाईचा येथे शिक्षण घेत असतांनाच देशसेवेची असलेली जिद्द व चिकाटीमुळे चार वर्षापुर्वी निलेश महाजन हे भारतीय सैन्यात भरती झाले व बेडगाव येथे प्रशिक्षणासाठी दाखल झाले.त्यानंतर काही वर्षापूर्वी मणिपूर येथे कर्तव्य बजावत होते.
प्रेमळ आणि शांत स्वभाव असणारे भारतीय जवान निलेश महाजन हे 6 नोव्हेंबर रोजी मणिपूर सिमेलगत विष्णुपूर परिसरात झालेल्या काउंटर अटॅकमध्ये कर्तव्यावर असतांना गोळी लागल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गुवहाटी येथे आर्मी रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून उपचार सुरु होते.मात्र काल दि 24 रोजी रात्री त्यांना उपचारादरम्यान विरमरण आल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
उपचारादरम्यान विरमरण झालेले शहीद जवान निलेश महाजन यांचे काका हे बि.एस.एफ मध्ये कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले होते.शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर सोनगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून याबाबत प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
