14 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू : जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात आगामी कळातील विविध आंदोलने, सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे जिल्ह्यात 31 जुलै 2021 रोजीच्या 00.01 ते 14 ऑगस्ट रोजी 23.55 वाजेपर्यंत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी, पोलिस अधीक्षक, धुळे यांनी सादर केलेला अहवाल पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सभा. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा दिव्यांग व्यक्तींना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाहीत.
तसेच मुंबई पोलिस अधिनियमानुसार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चा, मीटिंग, कार्यक्रम, रॅली इत्यादीबाबत स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य तो निर्णय घेवून परवानगी द्यावी. अशी देण्यात आलेली परवानगी लग्न समारंभ किंवा प्रेतयात्रेच्या जमावास शासनाने वेळोवेळी दिलेले निर्बंध लागू असतील, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे. हा आदेश 31 जुलै 2021 रोजीचे 00.01 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2021 रोजीच्या 23.55 वाजेपर्यंत लागू राहील.

WhatsApp
Follow by Email
error: