शेतकऱ्यांसाठी धुळे पाटबंधारे विभागाचे आवाहन…

बातमी कट्टा: कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरू झालेल्या खरीप हंगाम 2021 साठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत. सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल.बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आली असून मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजूरी, ना मंजुरीचा विचार करण्यात येईल.

मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल.

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी कळविले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: