बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील वनावल येथील महिला सरपंचाच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर आज दि 20 रोजी ग्रामसभा घेऊन मतदान सुरु आहे. यासाठी सकाळी गावात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वात ग्रामसभा घेण्यात आली व सकाळी 11 पासून मतदान सुरु करण्यात आले आहे. यासाठी 81 कर्मचारी तर 25 पोलीस पथकाचे कर्मचारी वनावल गावात दाखल झाले आहेत.गोपणीय पद्धतीने मतदान करण्यात येणार असून मतदान वेळ संपल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.

शिरपूर तालुक्यातील वनावल येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच पूना पौलद भिल व सदस्यांनी १० जून २०२१ रोजी सरपंच भावना पाटील यांच्याविरुद्ध शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे अविश्वास ठरावाची नोटीस दिलेली होती.या नुसार तहसीलदार आबा महाजन यांनी १६ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता वनावल ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेतली होती.यावेळी सदर अविश्वास ठरावाच्या बाजूने आठ सदस्यांनी तर विरोधात फक्त सरपंच यांनी मतदान केले होते.
लोकनियुक्त सरपंच विरोधात सदस्यांकडून बहुमताने अविश्वास ठराव पारीत करण्यात आला होता.मात्र सदर सरपंच ह्या थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांना अपात्र करण्याचा किंवा पदमुक्त करण्याचा अधिकार ग्रामसभेला असल्याने आज दि 20 रोजी वनावल येथे सकाळी विशेष ग्रामसभा बोलवून मतदान सुरु करण्यात आले आहे.

यासाठी गावात 6 मतदान केंद्रात मतदान करण्यात येत आहे.मतदान प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे असणार आहेत. तर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी सहा मतदान टिम, सहा मतमोजणी टिम व दोन राखीव टिम करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दिनांक १९ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेच्या कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली होती.जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी व आर.ओप्लांट जवळ मतदान केंद्र करण्यात येत आहे.मतदान करण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी ग्रामसभेत पुर्णता माहिती दिली. मतदान चिठ्ठीची(बॅलेट पेपर)घडी कशी करावी,सोबत ओळखपत्र म्हणून आधारकार्ड,बँक पासबुक, पँनकार्ड,पासपोर्ट,निवृत्त वेतनधारक ओळखपत्र, खासदार आमदारांनी अधिकृत दिलेले पत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र असले तरच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे.मतमोजणीसाठी विस्ताराधिकारी, ग्रामसेवक व शिक्षक यांच्या सहा टीम करण्यात आलेल्या आहेत.