बातमी कट्टा:- प्रधानमंत्री किसान योजनेत शेतकर्यांना येणार्या अडचणी दूर करुन पिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्यांना मिळावा म्हणून ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकार्यांना सूचना करण्यात येणार असून राज्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकर्यांच्या मागण्या ह्या योग्य असून त्यासाठी मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करीत विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी कृषी पुरस्कारप्राप्त शेतकर्यांच्या झालेल्या बैठकित सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी पुरस्कारप्राप्त शेतकर्यांच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकित शेतकर्यांना येणार्या विविध अडचणी आणि कृषी पुरस्कार प्राप्त शेतकर्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी कृषी पुरस्कार शेतकर्यांच्यावतीने चर्चा करतांना कृषी भूषण अॅड.प्रकाश पाटील यांनी सांगितले कि,पिक विमा योजना महाराष्ट्र शासन उत्कृष्टरित्या राबवित आहे मात्र राज्यातील जिल्ह्यातील शेतकर्यांचा सहभाग अत्यंत कमी आहे आणि त्यात धुळे जिल्हयाचा समावेश आहे त्यामुळे संबधित विभागामार्फत पिक विमा योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचे कामकाजावर महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी बहिष्कार टाकला आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांची कृषी व महसूल अशी टोलवाटोलवी होत आहे. सन्मानाच्या श्रेयवादात शेतकरी होरपळला जात असून या दोन्ही विभागात समन्वय घडवून प्रधानमंत्री किसान योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी याविषयावरही बैठकित चर्चा झाली. कृषी पुरस्कार शेतकर्यांच्या समस्यांवर बैठकि चर्चा करतांना पुरस्कार प्राप्त शेतकर्यांनी सांगितले कि,शेतीत विविध प्रयोग करीत असलेल्या शेतकर्यांना 1967पासून पुरस्कार दिला जात आहे.मात्र ह्या पुरस्कारप्राप्त शेतकर्यांसमोर आजही अनेक अडचणी असून पुरस्कार दिल्यानंतर त्यांचा कोणत्याही क्षेत्रात व उपक्रमात विचार केला जात नाही.त्यामुळे कृषीविषय योजना तयार करतांना व राबवितांना विविध समित्यांवर पुरस्कार मिळालेल्या शेतकर्यांनाच प्रतिनिधीत्व देण्यात यावे. शासनाच्या कृषी विभाग व कृषी विद्यापीठसंलग्नित होणार्या विविध कार्यक्रम व समारंभात शासकिय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाच्या प्रतिनिधीस व्यासपीठावर स्थान देण्यात यावे, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकर्यास मोफत बस प्रवास,शासकिय विश्रामगृहात सवलत, टोल माफी देण्यात यावी तसेच शासन निर्णय घेवून ओळखपत्रही देण्यात यावे.आत्मा विभागाकडून कृषी पुरस्कार शेतकर्याची कृषी मित्र म्हणून नेमणूक करावी अशा विविध मागण्यांवर आ.कुणाल पाटील यांच्यासोबत चर्चा झाली.यावेळी बैठकित आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, पिक विमा योजना आणि प्रधानमंत्री किसान योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व शेतकर्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी संबधित अधिकारी व कर्मचार्यांना सूचना दिल्या जातील. तसेच कृषी पुरस्कार प्राप्त शेतकर्यांच्या मागण्या ह्या योग्य असून त्यासासाठी मंत्रालयात पाठपुरावा करुन अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.बैठकिला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत कृषीभूषण प्रकाश पाटील, भिका पाटील, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर.प्रकाश, कृषीभूषण दिलीप पाटील, चेतन भदाणे, रावसाहेब पाटील,चंद्रकांत पाटील, अनंत ठाकरे, वाल्मिक पाटील, नरेंद्र जैन,अधिकार पाटील, महेंद्र पाटील, जयराम खर्चे, डॉ.निलेश गिरासे,भटू गिरासे,एकनाथ वाघ, हाटेसिंग गिरासे यांच्यासह पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.