बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारातील वाळू चोरी प्रकरणात दंड भरला नाही म्हणून आठ लाख 47 हजार रुपयांचा बोजा 7/12 उताऱ्यावर लावण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता तथा तक्रदार महेंद्र जाधव यांनी दिलेली माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारात वाळू चोरी प्रकरण महसूल विभागाने पंचनामे करून सन 2016 मध्ये शिवाजी लक्ष्मण माळी यांच्यावर 3 लाख 85 हजार रुपये व भूषण प्रताप मराठे यांच्यावर 4 लाख 62 हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले होते . माहिती अधिकार कार्यकर्ता महेंद्रसिंग जाधव यांनी हे संपूर्ण प्रकरण माहिती अधिकारातून प्राप्त करून घेत संबंधित प्रकरणातील सर्व दोषींवर कार्यवाही होऊन दंड वसूल व्हावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा केला होता . सदर प्रकरणातील जप्त केलेले वाळू च्या लिलाव करून शासनाला महसूल मिळवून देण्यासाठी देखील प्रशासनावर दबाव आणून लिलाव केला असता यातून देखील महसूल प्रशासनाला 19 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता .
मात्र शिरपूर तहसील कार्यालयामार्फत तत्कालीन तहसीलदार यांनी या प्रकरणात दंडाची वसुली केली नाही संबधीतांना बचावाची संधी दिली म्हणून या प्रकरणात लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान सदर प्रकरणात आपल्यावरील दंडात्मक कार्यवाही होऊ नये म्हणून या प्रकरणातील संशयितांनी उपविभागीय अधिकारी शिरपूर ,अप्पर जिल्हाधिकारी, धुळे, विभागीय आयुक्त नाशिक या सर्वांकडे अनुक्रमे अपील दाखल केले होते मात्र सदर प्रकरणातील साक्षीपुरावे पंचनामे इत्यादी ठोस कागदपत्रांमुळे सर्व स्तरावरून सदरचे प्रकरण नाकारण्यात येऊन दंडाची रक्कम कायम ठेवण्यात आली होते. यानंतर विभागीय आयुक्त यांच्या आदेशा विरोधात राज्य मंत्री महसूल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे देखील अपील दाखल करण्यात आले आहे मात्र सर्व स्तरावरून अपील नाकारण्यात येऊन देखील दंड वसूल केला नाही म्हणून तक्रारदार यांनी मागील चार वर्षांपासून सतत पाठपुरावा करत कारवाईची मागणी केली होती मात्र महसूल प्रशासनाने संबंधित आरोपींच्या शेतजमिनीचा शोध घेतला असता तालुक्यात त्यांच्या नावे शेतजमीन नसल्याने कार्यवाही करता येत नाही असा खुलासा केला होता. त्यावेळेस शेतजमीन नसेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणात मा. लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी धुळे यांना तात्काळ दंड वसुलीचे आदेश देऊन दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश पारित केले होते. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या महसूल प्रशासनाने शिरपूर तालुक्यातील सदर संशयितांची शेतजमीन शोधून काढत त्या त्यांच्या सातबारा उतारावर अनुक्रमे 3 लाख 85 हजार व 4 लाख 62 हजार असे एकूण 8 लाख 47 हजार रुपयांचा बोजा लावण्यात आला आहे व तसा खुलासा तक्रारदार व वरिष्ठ कर्यालयाला सादर केला आहे.