शिरपूर तालुक्यात सरसकट ओला  दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी…

बातमी कट्टा: ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी अशा मागणीचे निवेदन आ. काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले.

धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे आमदार, माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी गेल्या तिन दिवसांपूर्वी धुळे जिल्हाधिकारी व नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले होते.

त्यानंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी तालुक्यातील गंभीर परिस्थिती लक्षात आणून देऊन निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, संचालक नरेंद्र पाटील, शिरपूर शेतकरी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, रमण पावरा, जगन टेलर पावरा, जे. टी. पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.

शिरपूर तालुक्यातील शेतीचे नुकसान झाल्या बाबत आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.त्यानुसार योग्य तो अहवाल शासनाला पाठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

शिरपूर तालुक्यात तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अवकाळी आलेल्या अतिवृष्टीमुळे पिके, फळपिके, शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी बांधवांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन शेत जमिनीत पाणी साचले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती क्षेत्रात सततच्या पावसामुळे पाणी थांबल्याने पिके मुळासकट नष्ट झाले असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कोरडवाहू, बागायती, वार्षिक बागायती पिकांना तसेच पशुधन, गोठा व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावी तसेच संपूर्ण वर्षाचे विज बिल व पीक कर्ज माफ करावे अशा मागणीचे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: