बातमी कट्टा:- भाव वाढीच्या अपेक्षात कांदा चाळीत कांदा साठवून ठेवले असतांना चोरट्यांनी सुमारे 90 क्विंटल कांदा चोरी केल्याची घटना घडली आहे. करोना ,नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी चिंतेत असतांना अशा प्रकारे शेतकऱ्याच्या कांदा चाळीतून सुमारे 90 क्विंटल कादा चोरी झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहे.
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील शेतकरी सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतात कांदा चाळ भरून ठेवली होती. कांदा भाव वाढीच्या अपेक्षेने कांदा चाळीत 5 ते 6 महीन्यापासून कांदा साठवून भरून ठेवला होता.चोरट्यांनी चक्क थेट कांदा चाळीवर डल्ला मारला. शेतकरी सुभाष शिंदे यांचे भाऊ प्रफुल्ल शिंदे सकाळी शेतात गेले असता, त्यांना कांदा चाळीच्या बाहेर कांदे पडलेले दिसले. त्यांना शंका आल्याने त्यांनी कांदा चाळीत डोकावून पाहिले असता, त्यातून सुमारे 90 ते 100 क्विंटल कांदा चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. आजच्या बाजारभावानुसार तीन ते साडेतीन लाख रुपयांचा हा कांदा असल्याचे सांगितले जात आहे.यावेळी, प्रफुल्ल शिंदे यांनी शेतकरी सुभाष शिंदे यांना कांदा चोरीला गेल्याची तात्काळ माहिती दिली. शेतकरी शिंदे यांचा मुलगा हर्षल शिंदे यांनी याबाबत नेर पोलीस ठाण्यात व धुळे पोलीस स्टेशनात माहिती दिली.अन्य शेतकऱ्यांनी देखील कांदा चाळीत साठवून ठेवला आहे.या चोरीमुळे शेतकरी भयभीत झाले असून, याची लवकरात लवकर चौकशी करून चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.