बातमी कट्टा- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत तब्बल 3 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या कामांमुळे तालुक्यातील गावात विकासासाठी मोलाची भर पडणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
धुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासाचा समतोल साधला जावा आणि त्या त्या गावातील रस्ते, चौक, आणि विविध वसाहतींना मूलभूत सुविधा पुरविता याव्यात यासाठी आमदार कुणाल पाटील यांच्या विकास आराखड्यानुसार धुळे तालुक्यात विकास कामांना गती दिली जात आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये विकासाची कामे मंजूर केली आहेत. त्यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करून सुमारे 3 कोटी 45 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीच्या माध्यमातून सोलर हाय मास्ट, सोलर स्ट्रीट लाइट, सामाजिक सभागृह बांधकाम करणे, गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, चौक सुशोभिकरण, मागासवर्गीय वसाहतीत मूलभूत सुविधा पुरविणे, स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधकाम करणे अशी विविध विकासाची कामे केली जाणार आहेत. त्यात लामकानी, गोंदुर, जुन्नेर, फागणे, देऊर बु., चांदे, आर्वी, बोरीस, लामकानी,अजंग, बोरविहीर, नरव्हाळ, बुरझड, बेंद्रेपाडा, न्याहळोद, अनकवाडी, लळिंग, हेंद्रूण, बाभुळवाडी, शिरधाने प्र. नेर, दापुरा, मांडळ या गावांचा समावेश आहे. दरम्यान या कामांबरोबरच धुळे तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये विकासाची कामे करून विकसनशील तालुका घडविणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान धुळे तालुक्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे आमदार कुणाल पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.