बातमी कट्टा: जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरीता त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले.
तळोदा तालुक्यातील बोरद येथील आरोग्यवर्धनी केंद्राच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन पालकमंत्री ॲड पाडवी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तहसिलदार गिरीष वखारे, जिल्हा साथरोग अधिकारी एन. एल. बावा, पंचायत समिती उपसभापती लता वळवी, जि.प. सदस्य सुहास नाईक, हेमलता शितोळे, सुनिता पवार, संगीता वळवी आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत असून येथील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. कोरोना काळातही जिल्ह्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यात. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत हे प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्र उभारण्यात आले असून त्यावर 1 कोटी 81 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतीगृह, शस्त्रक्रीया कक्ष, औषध भांडार आदी सुविधा येथे उपलब्ध असतील, अशी माहिती डॉ.चव्हाण यांनी यावेळी दिली.
प्रारंभी पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आरोग्यवर्धनी केन्द्रातील विविध कक्षात जावून तेथील सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.