बातमी कट्टा:- धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील ट्रामा केअर सेंटर च्या उभारणीसाठी अडीच कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.
कुसुंबा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 आणि दोंडाईचा- कुसुंबा-मालेगाव या महामार्गावरील सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार व्हावेत तसेच गंभीर आजार असलेल्या आणि तातडीची उपचाराची गरज असलेल्या रुग्णांकरिता कुसुंबा येथील ट्रामा केअर सेंटर व्हावे यासाठी आमदार कुणाल पाटील यांचे गेल्या अनेक वर्षापासून चे प्रयत्न. सुरू होते, त्यानंतर या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर मंजुर करण्यात आले. दरम्यान ट्रॉमा केअर सेंटरसाठी कुसुम्बा येथील जिल्हा परिषदेची जीर्ण झालेल्या प्राथमिक शाळेची जागा घेण्यात आली, ती जागा आरोग्य विभागाच्या नावे करण्यासाठी आ.पाटील यांनी पाठपुरावा केला अनेकदा जिल्हा नियोजन समिती बैठकीत मुद्दा उपस्थित करुन त्या जागेचा प्रश्न निकाली काढला.मात्र निधीअभावी ट्रामा केअर सेंटर उभारणीचे काम प्रलंबित होते, म्हणून कुसुंबा येथे मंजूर असलेल्या ट्रामा केअर सेंटरसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात यावी यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य विभाग स्तरावर वारंवार बैठका घेतल्या. त्यानंतर आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडेही वैयक्तिकरित्या भेट घेऊन अनेकवेळा निधीची मागणी केली होती.आरोग्य विभागाच्या टाईप प्लॅननुसार इमारतीचे तळमजला बांधकाम मंजूर होते परंतु उपलब्ध जागा कमी असल्यामुळे बांधकामात तळमजला, पहिला मजला, असा बदल करून सुधारित नकाशा प्रमाणित करण्यात आलेला आहे.
त्या नकाशानुसार सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी 5 कोटी 85 लक्ष रुपये रक्कमेची आवश्यकता होती त्यानुसार निधी मिळावा यासाठी आ. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या होणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात ट्रामा केअर सेंटरसाठी निधी मिळावा म्हणून आवाज उठविला होता. त्यामुळे सुरू असलेल्या डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पात 2 कोटी 50 लक्ष रुपयांची तरतूद ट्रामा केअर सेंटरसाठी करण्यात आली आहे. उर्वरित निधी दुसऱ्या टप्प्यात मंजूर केला जाईल व त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान निधीची तरतूद झाल्यामुळे ट्रामा केअर सेंटर उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून कुसुंबासह परिसरातील व तालुक्यातील जनतेने आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. निधीची तरतूद करून दिल्याबद्दल आमदार कुणाल पाटील यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.