
बातमी कट्टा:- रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना दि 16 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटनास्थळी खून करणाऱ्याने कुठलाही पुरावा ठेवला नव्हता.मात्र शिरपूर शहर पोलीसांनी या गुन्ह्याची कसून चौकशी केली असता खून करणारा मयताचा चुलत भाऊ असल्याचे निष्पन्न झाले.त्या संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
शिरपूर तालुक्यातील निमझरी ते सामर्यापाडा रस्त्यालगत निमझरी शिवारात झाडाखाली सामर्यापाडा येथील संजय बोंग्या पावरा वय 32 या तरुणाचा दि 16 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता.घटनास्थळी जवळील रस्त्यावर मयत संजय पावरा याची मोटारसायकल व चप्पल मिळुन आली होती.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,सा.पोलीस निरीक्षक गणेश फड,पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे,छाया पाटील यांच्यासह शोध पथक दाखल झाली होती.
घटनास्थळी कुठलाही ठोस पुरावा पोलीसांना मिळुन आला नव्हता.यामुळे आरोपी शोधणे पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तात्काळ वरीष्ठांना कळवून शिरपूर पोलीसांचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला.सदर पोलीसांनी 48 तासात रात्रंदिवस मेहनत घेऊन या घटनेत चौकशी करत मयत संजय पावरा याचा चलुत भाऊ दरबार कुमारसिंग पावरा वय 26 याला पोलीसांनी ताब्यात घेत विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने संजय पावरा याचा खून केल्याची कबूली दिली.
खूनाचे कारण विचारले असता संशयित दरबार पावरा याने सांगितले की,मयत संजय पावराच्या वडीलांनी संशयित दरबार पावरा याच्याकडुन 15 हजार 500 रुपये उसनवारी घेतले होते.त्या पैसांची परतफेड करता न आल्याने मयत संजय पावराच्या वडीलांनी संशयित दरबार पावराला काही जमीन गहान ठेवली होती.मात्र त्या गोष्ठीला मयत संजय पावरा व त्याच्या पत्नीचा विरोध होता.त्यातून एक वर्षापासून त्यांच्यात वाद सुरु होता.त्याच वादातून डोक्यात राग ठेऊन संशयित दरबार पावरा याने संजय पावरा याचा दि 15 रोजी रात्री 8 वाजेच्या रात्रीच्या सुमारास शिरपूर निमझरी नाका येथुन पाठलाग केला निमझरी व सामर्यापाडा गावादरम्यान निर्जनस्थळी मोटरसायकल मधील पेट्रोल संपले असून पेट्रोल देण्याच्या बहाना करुन संजय पावराची मोटरसायकल थांबवली आणि मागचा वाद उकरुन काढत मारहाण करत संजय पावरा याचा दगडाने ठेचून खून केल्याची संशयित दरबार पावराने कबुली दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख सा.पोलीस निरीक्षक गणेश फड,म.पो.स.ई सी.बी.पाटील, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, ललीत पाटील, रुपेश गांगुर्डे, तुकाराम गवळी,विनोद अखडमल,प्रवीण गोसावी,गोविंद कोळी,मुकेश पावरा, मनोज दाभाडे,अनिल अहिरे,प्रशांत पवार,सुरेश महाले, रोशनी पाटील आदींनी कारवाई केली आहे.