बातमी कट्टा:- सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.याबाबत पोलीसांनी चौकशी सुरु केली असता पार्टीसाठी सोबत आलेल्या दोघांनी तिसऱ्या मजल्यावरून ढकलून त्या तरुणाचा खून केल्याचे उघड झाले आहे.याबाबत सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार जळगाव शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मुकेश रमेश राजपूत वय 32 रा. नाथवाडा या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली होती.जळगाव शहरातील खाऊ गल्लीत मुकेश राजपूत हा एका चायनीज सेंटवर कामाला होता.सोमवारी रात्री कामे आटोपून मुकेश घरी गेला होता.त्यावेळी अमर ऊर्फ लखन शांताराम बरोट वय 29 व पराग ऊर्फ बबलू रवींद्र आरखे वय 23 या दोघांनी मुकेश याला पार्टीसाठी घरून बोलवून घेतले.दारु व बिर्याणी घेऊन तिघेही जण गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर गेले.यावेळी लखन व पराग यांनी बबलु सोबत वाद घातला.हमरीतुमरी नंतर दोघांनी मुकेश याला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलले.यामुळे मुकेश राजपूतचा मृत्यू झाला.यानंतर लखन व पराग दोघेही जण पोलीस स्टेशनात जाऊन मुकेश राजपूत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचा सांगितले.
मुकेश राजपूत याचा मृतदेह रुग्णालयात दाखल करत जळगाव शहर पोलीस स्टेशनात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.नातेवाईकांनी मुकेशचा घातपाताचा संशय व्यक्त केला.पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवले असता गोलाणी मार्केट येथे चौकशी करण्यात आली व एका दुकानात सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रीत झाले आहे.पोलीसांनी लखन व पराग दोघांना ताब्यात घेत कसून विचारपूस केली असता त्यांनी निखील रमेश सोनवणे याच्या सांगण्यावरून मुकेशला मारल्याची कबुली दिली. पोलीसांनी तात्काळ निखील सोनवणे याला ताब्यात घेतले आहे.प्रेमसंबधातून खून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.