बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील क्रांतीनगर परिसरात बर्निंग कारचा थरार गुरुवारी नागरिकांना अनुभवायला मिळाला. सुदैवाने मदत आणि आग विझवण्याची सुविधा तातडीने उपलब्ध झाल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.
गुजर खर्दे येथील रहिवासी सुनील मोहन गुजर त्यांच्या डस्टर कार (एमएच 43, एएन 1406) ने शिरपूरकडे येत होते. क्रांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर कारमधून जळल्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी कार बंद केली. बाहेर जाऊन पाहिले असता इंजिनमधून धूर येत असल्याचे आढळले. काही वेळातच वायरलूम पेटल्याने ज्वाळा बाहेर पडू लागल्या.
गुजर यांनी आरडाओरड करून नागरिकांना मदतीसाठी बोलावले. परिसरातील युवकांनी प्रसंगावधान राखून पेटती कार ढकलत नेऊन क्रांतीनगर येथील सिवेज प्लांटच्या टँकर भरण्यासाठी तयार केलेल्या पाईप पोस्टखाली उभी केली. वरून संततधार पाणी सोडले. काही वेळाने आग विझवण्यात यश आले. मात्र इंजिन व लगतच्या भागाचे नुकसान झाले. हा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.



