बातमी कट्टा:-सोलापूर जिल्ह्यातून ऊसतोड मजूर घेण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील शेंधवा तालुक्यात आलेल्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर व्यक्तीचा घातपात की अपघात याबाबत पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.त्या व्यक्तीचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शिरपूर पोलीसांनी प्राथमिक चौकशी केली असून सदर घटनेत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील प्रमोद रेडे वय 34 यांनी शिरपूर पोलीसांना दिलेल्या जबाबानुसार प्रशांत महादेव भोसले वय 39 वर्ष रा.बेंबळे ता.माढा जि.सोलापूर हे तुकाराम रेवाज्या पावरा रा.बामुळे ता.चोपडा याच्या मदतीने परराज्यातून ऊसतोड मजूर गोळा करुन त्यांना ऊसतोडी मजुरी करिता त्यांच्या तालुक्यातील आजूबाजूच्या गावात घेऊन जात असतात.
प्रशांत महादेव भोसले हे सोलापूर जिल्ह्यातीलच प्रमोद रेडे,बापू कांतीलाल गिरने,सखाराम पिराजी जगताप आदींसोबत ऊसतोड मजुर घेण्यासाठी निघाले त्यांनी चोपडा तालुक्यातील तुकाराम रेवाच्या पावरा यास सोबत घेऊन शेंधवा तालुक्यातील चचर्या येथे राहणाऱ्या मुकडदमला भेटले प्रशांत भोसले यांचे व्यवहाराबाबत बोलणे झाल्यानंतर सागर मोरे यास त्याची पिकअप २४ मजूर घेऊन सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुशिला लक्ष्मण पेट्रोल पंप जवळ बोलावून तेथे मजूरांना १ लाख रूपये दिले व सागर मोरे याच्या फोन पे वर ५० हजार रूपये ट्रान्सफर करून मजूरांच्या पिकअप वाहनात पुढील सिटवर प्रशांत भोसले, एक ऊसतोड मजूर व चालक सागर मोरे आणि मुकडदम बसून सोलापूर जाण्यासाठी निघाले.त्यांच्या मागच्या असलेल्या चारचाकी वाहनात प्रमोद रेडे,बापू कांतीलाल गिरने,सखाराम पिराजी जगताप ,तुकाराम पावरा हे जात असतांना धानोरा रस्त्यावर प्रशांत भोसले यांचा जोराने ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांचा पाठलाग केला असता प्रशांत भोसले यांच्या खिशातील चाळीस हजार रुपयांसह पँंड बळजबरीने हिसकावून मारहाण करून पिकअपच्या खाली फेकून त्यांच्या पायावरून वाहन चालवून पळून पिकअप वाहन पळून गेल्याचे आढळून आले.प्रशांत भोसले यांना शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल रुग्णालयात दाखल केले व तेथून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व तेथे प्रशांत भोसले यांना मयत घोषित केले.
याबाबत घटनेची माहिती शिरपूर शहर पोलीसांना मिळाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी धाव घेत चौकशी केली. शिरपूर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आल्याने पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांनी घटनेची प्राथमिक चौकशी करत उपस्थित लोकांचा जाबजवाब नोंदवून घेतले. प्रशांत भोसले यांचा मृतदेह रुग्णालयात दाखल केला त्यावेळी त्यांच्या अंगावर पँट नव्हती.पायावर वाहनाचे चाक गेल्याची निशाणी दिसून येत आहे.सदरची घटना घातपात की अपघात याबाबत अधिक शेंधवा तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतरच उघड होणार आहे.जवाबानुसार ऊसतोड मजूरांसह पिकअप चालक आणि मुकडदम यांनी संगमताने बळजबरीने मारहाण करु पैसे हिसकावून प्रशांत भोसले यांना पिकअप बाहेर फेकून दिल्याचे सांगितले आहे.