महिलेची हत्या की आत्महत्या ? संशयास्पद मृत्यूने खळबळ

बातमी कट्टा:- विवाहित महिलेचा घातपात झाला असून संशयास्पद मृत्यू झाला आहे.या घटनेची सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रोश मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला होता.अखेर पोलीसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कारासाठी माहेरी नेले.या संपूर्ण घटनेतून पोलीस तपासात काय उघड होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील आशाबाई सीयाराम पावरा वय २२ वर्ष या विवाहित महिलेचा मृतदेह दि १७ डिसेंबर रोजी तालुक्यातील झेंडेअंजन शिवारातील विहीरीत पडला होता.याबाबत तालुका पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली.आशाबाई पावरा हिचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला व दि १८ रोजी मृतदेहाचे श्वविच्छेदन करण्यात आले.

मृत आशाबाई हिच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार आशाबाई हिचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते.मात्र दोन वर्षानंतर शेती काम व घरकाम येत नाही अशा कारणावरून सासरचे छळ करत होते.यामुळे आशाबाई या माहेरी धाबापाडा येथे राहत होते.दि १५ रोजी आशाबाईला घेण्यासाठी सियाराम पावरा हे धाबापाडा येथे गेले होते.एक दिवस मुक्काम राहुन दि १७ रोजी सियाराम हे पत्नी आशाबाईला घेऊन सासरी वकवाड गावी आले.

मात्र त्याच दिवशी दि १७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सियाराम पावरा याने आशाबाईचा भाऊ मंगेश याला फोन करून आशाबाईचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलीस व माहेरचे नातलग घटनास्थळी पोहचत नाही तोवर विहीरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर देखील आशाबाईचे पती व तीचे सासरचे कुटूंब तेथे पोहचले नाहीत. यामुळे आशाबाईचा संशयास्पद मृत्यू झाला असून सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करावा अन्यथा कारवाई शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.अखेर पोलीसांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासनानंतर आशाबाई हिचा मृतदेह घेऊन नातेवाईक माहेरी धाबापाडा येथे अंत्यसंस्कारासाठी निघाले.याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस तपासात काय उघड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: