बातमी कट्टा:- यावेळेस शिरपूरात अशी शिवजयंती साजरी होणे अपेक्षित आहे ज्या मुळे शिवजयंतीची आदर्श मिरवणूक “ब्रँण्ड” म्हणून ओळखली जाईल.या मिरवणूकीत सर्व धर्म समभाव दिसायला हवा,असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांनी शांताता कमेटीच्या बैठकी दरम्यान केले.
काल दि १२ रोजी सकाळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर,पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे, उपनिरीक्षक संदिप मुरकुटे यांच्या सह शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित होते.
शिरपूरात शिवजयंती मिरवणूकीचा आदर्श ब्रँड होणे अपेक्षित असून सर्वत्र शिरपूर येथील शिवजयंतीचा आदर्श घेतला जाईल अशी शिवजयंती साजरी व्हावी असे आवाहन पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर बोलतांना म्हणाले की शिरपूरात शिवजयंतीला बाहेरहुन कुठलाही फौजफाटा मागवणार नाही.शिवजयंतीची मिरवणूक शिस्तबद्ध पध्दतीने ठरलेल्या मार्गाने जाईल.मोटरसायकल रॅलीत तीन सिट,हुलड्डबाजी नको कारण लहान लहान गोष्टींमुळे मोठे नुकसान होते. मोबाईल स्टेटसला आता जास्त महत्व प्राप्त झाल्याने मोबाईल च्या स्टेटस मुळे मोठ्या घटना घडून जातात त्यामुळे दुसऱ्यांच्या भावना दुखावतील असे कुठलेही स्टेटस,फलक लावू नये.
यावेळी माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीचा मार्गाची माहिती दिली व शिवजयंती निमित्त लावण्यात येत असणाऱ्या बॅनर मध्ये फक्त शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे मोठे फोटो असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.
मिरवणूकी दरम्यान विज पुरवठा खंडित होतो ज्यामुळे अडथळा निर्माण होत असतो.यामुळे महावितरण विभागाला देखील महत्वाच्या सुचना देण्यात यावे असे माजी नगरसेवक रोहीत रंधे यांनी सांगितले.
तर शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस मद्य विक्री बंद ठेवण्यात यावी अशी मागणी करत मिरवणुकीत रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजू द्यावे अशी विनंती मनोज धनगर यांनी केली.तर महाराणा प्रताप यांच्या जयंतीची आठवण देत शिवजयंतीला देखील आदर्श निर्माण होईल असा विश्वास भरतसिंग राजपूत यांनी व्यक्त केला.