बातमी कट्टा:- हाणामारीच्या गुन्ह्यात संशयितांविरुध्द वाढीव कलम लावुन संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस हवालदाराने 20 हजारांची लाचेची मागणी करत त्यापैकी 10 हजारांची लाच स्विकारतांना धुळे लाचलुचपत विभागाने पोलीस हवालदाराला रंगेहाथ ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तकारदार हे मौजे पिंपळगाव दाभडी, ता. चांदवड, येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार व त्यांचे भाऊ यांची मौजे रायपुर, ता. चांदवड येथे शेत जमीन असून या शेत जमीनीतील एक सामाईक रस्त्याच्या वहीवाटीवरून त्यांच्या भावा भावांमध्ये वाद व हाणामारी होवुन त्यांच्यात परस्पर विरोधी चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांच्या वतीने त्यांचे भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्हयात संशयितांविरुध्द वाढीव कलम लावुन संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस हवालदार हरी जानु पालवी यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दुरध्वनी व्दारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहीती कळविली होती. त्यावरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चांदवड येथे येवुन तक्रारदार यांची तकार नोंदवुन सदर तक्रारीची दि. ०१.०६.२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पोलीस हवालदार हरी जानु पालवी यांनी तक्रारदार यांचेकडे २० हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये चांदवड येथील गणुर चौफुली येथील चांदवडकर अमृततुल्य चहाच्या दुकानावर स्विकारतांना त्यांना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरुध्द चांदवड पोस्टे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, तसेच राजन कदम,शरद काटके,संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, भूषण शेटे, भुषण खलाणेकर, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार वनश्री बोरसे, प्रशांत बागुल, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांनी केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.