बातमी कट्टा:- तपास काम आटोपून शासकीय चारचाकी वाहनाने परत जात असतांना अचानक चिंचाचे झाड कोसळल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे सा. पोलीस निरीक्षक आणि चालकाचा जागिच मृत्यू झाला तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना काल दि 29 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे सा.पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर वय ३६ हे चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे आपल्या पथकासोबत तपासाच्या कारवाईसाठी सकाळी गेले होते.रात्री कार्यवाहीचे काम आटोपून एरंडोल जवळ कासोद्याकडून जळगाव कडे एम एच29 एम 0751 क्रमांकाच्या शासकीय वाहनाने परत येत असतांना रात्री 9 वाजेच्या सुमारास अंजनी धरणाजवळ त्यांच्या चालत्या वाहनावर अचानक चिंचेचे झाड कोसळले.पाऊस सुरु असतांना काही कळायच्या आतच झाड कोसळले.घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहनातील सर्वांना बाहेर काढले यात सा.पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर भरत जठरे ,नीलेश सुर्यवंशी व चंद्रकांत शिंदे हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एरंडोल पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.काही वेळात पोलीस अधीक्षक एम राजकुमार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नवारकर घटनास्थळी दाखल झाले.जखमींना तात्काळ एरंडोल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.जखंमीची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे.