
बातमी कट्टा:- गेल्या वर्षी युवतीच्या इच्छेविरोधात गर्भपात करताना झालेल्या निष्काळजीमुळे युवतीचा मृत्यू झाला होता.या प्रकरणात डॉक्टरसह एका विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांत तक्रार देऊनही कार्यवाही न झाल्याने मृत मुलीच्या वडिलांनी येथील न्यायालयात तक्रार दिली होती.न्यायालयाच्या आदेशावरून संशयितांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या १ नोव्हेंबरला त्यांच्या युवतीच्या पोटात दुखत होते.युवतीच्या वडीलांनी याबाबत तिच्याकडे
विचारपूस केल्यावर तिने आपण गर्भपात केल्याचे सांगितले. दुखणे वाढल्यामुळे तिला शहरातील खासगी रुग्णालय व तेथून धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.४ नोव्हेंबरला उपचार घेत असताना तिचे निधन झाले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.मृत मुलीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना देण्यात आला. त्यात गर्भाशयाला कट लागल्याने रक्तस्त्राव होऊन पोटात रक्त साचल्याने विषाणू संसर्ग होऊन तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. त्यानंतर मृत मुलीचे वडील घरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीने माहिती दिल्यावर या प्रकाराचा उलगडा झाला.
२० ऑक्टोबरला कपडे घेण्यासाठी ती लहान बहिणीसह बाहेर गेली होती. त्या वेळी त्यांना संशयित अमृत आनंदा पाटील (वय २९, रा. उपरपिंड, ता. शिरपूर) याने धुळे येथील तुषार हॉस्पिटलमध्ये बळजबरीने बोलावून घेतले. तेथे डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी युवतीची तपासणी करून चार महिन्यांची गर्भधारणा झाल्याचे सांगितले. संशयित अमृत पाटील याने तुझा या डॉक्टरांकडे गर्भपात करावयाचा आहे, असे सांगितले. त्यास युवतीने नकार दिला. त्यावर अमृत पाटील याने गर्भपात न केल्यास तिच्यासह आई-वडिलांनाही ठार करण्याची धमकी दिली. त्यानंतर बळजबरीने तिचा गर्भपात करण्यात आला. डॉ. रघुवंशी यांनी दिलेली औषधे युवतीला सोबत देऊन संशयिताने पुन्हा ही बाब कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना ठार करण्याची धमकी दिली. तेथून युवती बहिणीसोबत निघून गेली.
तिच्या गर्भपाताबाबत उलगडा झाल्यानंतर तिचे वडील धुळे येथे डॉ. रघुवंशी यांच्याकडे गेले. त्या वेळी त्यांची मोठी मुलगीही सोबत होती. डॉक्टरांना विचारणा केल्यानंतर त्यांनी गर्भपात केल्याची कबुली दिली. त्यानंतर युवतीचे वडील व भाऊ संशयित अमृत पाटील याच्या घरी गेले. त्यांनी मुलीशी संबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाली व गर्भपातामुळे तिचा मृत्यू झाला, असे सांगितले. त्याचा राग आल्याने संशयिताने त्यांना मारहाण करून ठार करण्याची धमकी दिली. याबाबत पोलिसांत तक्रार देऊनही कार्यवाही न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.