
बातमी कट्टा:- नवीन मोटरसायकल घेण्यासाठी चक्क बॅंकेत कटरच्या साह्याने चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास पकडण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश मिळाले आहे. रात्रीच्या सुमारास शिरपूर येथील बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेचे कुलूप कटरच्या साह्याने कापून शटर खोलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि १ रोजी मध्यरात्री २:४२ ते ३:४१ वाफेच्या दरम्यान शिरपूर शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स जवळील आर के कॉम्प्लेक्स मधील बॅंक ऑफ इंडिया येथे अज्ञात चोरट्याने बॅंकेत चोरी करण्याच्या उद्देशाने लोखंडी शटरला लावलेले कुलूप व शटरचे सेंटर लॉक लोखंडी कटरच्या साह्याने कापुन शटर उघडण्याचा व बॅंकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले होते.याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलिस निरीक्षक के.के.पाटिल यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून गुन्हे शोध पथकाचे अमलदारा मार्फत घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांमार्फत अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असतांनाच शिरपूर येथील विधी संघर्षग्रस्त बालकाने मोटरसायकल घेण्यासाठी बॅंकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील, उपनिरीक्षक संदिप द्रव्ये,शोध पथकाचे ललित पाटील, रवींद्र आखडमल,मोज महाजन,आरीफ तडवी,विनोद आखडमल,योगेश दाभाडे,प्रशांत पवार, गोविंद कोळी,मनोज दाभाडे,भटु साळुंखे व सचिन वाघ आदींनी अवघ्या ४८ तासांच्या आत शिताफीने कारवाई करत विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.