बातमी कट्टा:- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धुळे अंतर्गत जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला निनावी सुचनेनूसार अल्पवयीन मुलीचा विवाह शिरपूर तालुक्यातील अजनाळे येथे 29 डिसेंबर रोजी होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यावर समितीमार्फत त्वरीत कार्यवाही करुन अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे.
मिळालेल्या सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिश चव्हाण, यांनी समन्वय साधुन योगेश जाधव, संरक्षण अधिकारी (क) सौ. तृप्ती पाटील, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक), योगेश धनगर, रुपाली झाल्टे, ज्योती परदेशी, चाईल्ड लाईन प्रतिनिधी आदिंनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला.
याबाबतची कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उमेश बोरसे, सहा. पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने सतिश चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस कर्मचारी यांचेशी समन्वय साधून केली.