बातमी कट्टा- खरिपाच्या पहिल्याच पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागलेली आहेत. अशावेळी उजव्या कालव्यातून पाणी सोडून पिकांना जीवदान देण्याचे काम आ. कुणाल पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे आज उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. आणि गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागलेली आहेत. तसेच शेतातील विहिरींनीही तळ गाठला असून अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशावेळी पिकांना जीवदान मिळावे म्हणून नेर परिसरातील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार दोन दिवसात उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येईल असा शब्द आ. पाटील यांनी दिला होता. आमदार कुणाल पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून उजव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्यात यावे असे सांगितले. आमदार कुणाल पाटील यांच्या सूचनेवरून आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे नेर,देऊर, भदाणे, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराने येथील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंनंद व्यक्त केले आहे. उजव्या कालव्याच्या मुख्य दरवाजाचे चक्र फिरून पाणी सोडण्यात आले यावेळी काँग्रेसचे आनंद पाटील, दिलीप बिरारी,आर.के वाघ पांडूरंग खलाणे प्रकाश खलाणे साहेबराव गवळे,गणेश पाटील मधुकर आहिरे योगेश गवळे,डाॅ.सतिष बोढरे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता जगदीश खैरनार प्रशांत पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.