
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बाळदे सबस्टेशन येथे रोजच तीन ते चार वेळा इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण विभागाच्या कार्यकारी उपअभियंतांना घेराव घालत जाब विचारला.बाळदे सबस्टेशनवर ईमर्जन्सी लोडशेडींगच्या नावाने सुरु असलेला मनमानी कारभार थांबवण्यात यावा यासाठी परिसरातील नागरिकांच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की,गेल्या काही दिवसांपासून बाळदे सबस्टेशन हद्दीतील गावांमध्ये रोजच दिवसभरात तीन ते चार वेळा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असतो. कुठल्याही वेळेच बंधन न ठेवता तीन ते चार तास विद्युत पुरवठा खंडित केला जातो.यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसह महिला व नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत संबधीत अधिकारींना विचारणा केली तर बाळदे सबस्टेशनची वसूली कमी असल्याने बाळदे सबस्टेशन ला इमर्जन्सी लोडशेडींगचा सामना करावा लागत असल्याचे उत्तर दिले जाते.इतरत्र सबस्टेशन वरील विद्युत पुरवठा सुरळीत सुरु राहत असतांना फक्त बाळदे सबस्टेशन वरच ईमर्जन्सी लोडशेडींग का लागू करण्यात येते ?असा प्रश्न परिसरातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.बाळदे सबस्टेशन येथे इमर्जन्सी लोडशेडींगच्या नावाने सुरु असलेल्या विद्युत पुरवठ्याचा भोंगळ कारभार तात्काळ थांबवला नाही तर येत्या काही दिवसात महावितरण विभागाच्या कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात येईल, आणि या सर्व बाबींना महावितरण विभागाचे अधिकारी जबाबदार असतील असे निवेदनात नमूद करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.